दत्ता मजला प्रसन्न होसी जरी तू वर देसी ।।
बऱ्याच दिवसांनी आज हे पद पुन्हा मनात आले. गेल्या एक दोन वर्षात हार्मोनियम ला हात देखील लावला नव्हता. पण आज गुरुकृपेकरुन मनात इच्छा झाली आणि हे पद म्हटले आणि मन २५-३० वर्षे मागे गेले. मनात आले आपल्या या प्रिय अशा दत्त प्रभुंवर काही लिहावे. अर्थात ही बुद्धी देणारे देखील दत्तमहाराजच बरं का. मी त्यांच्या इच्छेने लिहिता झालो इतकेच.
विचार आला की आपली आणि यांची (दत्तप्रभूंची) ओळख झाली तरी केव्हा. मग लक्षात आले, आम्ही त्यावेळेस कऱ्हाड ला राहत होतो. त्याकाळी ७० हजार ते १ लाख लोकसंख्येचे परिपूर्ण शहर. गावच्या सोमवार पेठेत त्याकाळी म्हणजे आजपासून २५-३० वर्षांपूर्वी, रात्री साधारण ८ ते ८.३० लाच निजानीज व्हायची. आम्ही त्यावेळेस मामाच्या वाड्यात म्हणजे पटवर्धन वाड्यात राहत असू.
आई त्यावेळेस आम्हा तिघा भावंडाना झोपवायला नृसिंहवाडीच्या पालखीच्या वेळेस म्हटली जाणारी नित्यपाठातील पदे म्हणत असे. शांत हो श्रीगुरुदत्ता, जय करुणाघन, श्री गुरुदत्ता जय भगवंता या करुणात्रिपदीची आणि माझी तिथेच ओळख झाली. त्याबरोबरच इतुके दे मजला, इंदुकोटी अशा अनेक पदे स्तोत्रे यांची ओळख झाली. माझ्या आईचे आजोळ नृसिंहवाडी (म्हणजेच नरसोबावाडी). दत्तप्रभूंची राजधानी आणि दत्त भक्तांची पंढरी. तो जमाना होता कॅसेट प्लेयरचा. आमच्या कडे आर. एन. पराडकर यांची दत्त भजनांची एक कॅसेट होती. का कोण जाणे मला त्यातील सर्व पदे खूप आवडत असत. नकळत संस्कार होण्याचे ते वय असते हेच खरं. अशीच सगळी गाणी गुणगुणता मी नकळत ती गाणी गायला लागलो. मला आठवतं की आमच्या घरी किंवा मामाकडे कोणी आलं की मला ते लोक ही गाणी गायला सांगत. मी देखील ती खूप मन लावून गात असे.
मग यथावकाश ४-५ वीत असताना माझी गाण्याची शिकवणी सुरु झाली . याचे सगळे श्रेय माझ्या आईला जाते. तिनेच मला गायला लावलं आणि मला शिकवलं. सुरवातीला तर क्लास सुरु असताना मी घराबाहेर पळून जात असे. पण आईने मला पकडून आणून आमच्या गुरुवर्य श्री. अशोक कुलकर्णी सरांसमोर बसवलं आणि मग हळूहळू गोडी वाढत गेली. सरानी देखील मला अभंग आणि भक्तिगीते शिकवली आणि ही आवड वाढत गेली.
आमच्या आईचे मामा वाडीचे असल्याने माझे देखील बऱ्याच वेळेस वाडी ला तसेच औदुंबर ला जाणे झाले. तसेच अक्कलकोट, माणगाव (प. प. गुरुमाऊली वासुदेवानंद सरस्वती टेम्बे स्वामी महाराज यांचे जन्मस्थान) येथे त्यानंतर येणेजाणे झाले आणि दत्त प्रभूंची ही ओळख अजून घट्ट होत गेली.
मग डोंबिवलीला आल्यावर काही वर्षात गाणे दूरच राहिले. पण दत्तप्रभूंची आणि माझी जोडी काही चुकली नाही. जसे बाळाची काळजी आई घेते तसे या मुंबई सारख्या माया नगरीत आल्यावर त्यांच्याच कृपेने चांगली माणसे भेटली आणि त्यांनी "स्मर्तृगामी" हे आपले ब्रीद सार्थ केले.
२०११ च्या सुमारास आई वडिलांसोबत गरुडेश्वर येथे प. प. गुरुमाऊली वासुदेवानंद सरस्वती टेम्बे स्वामी महाराज यांची समाधी आहे तेथे जाण्याचा योग आला.
काही वर्षांपूर्वी अजून एक छान योग जुळून आला. जुलै २०१४ साली आमचे डोंबिवलीचे अविनाश देवधर सर आणि त्यांचे बायर फार्मा मधील मित्र पंत यांचे बरोबर बेळगाव ला जाणे झाले. हे आनंद पंत म्हणजे पंत महाराज बाळेकुंद्री यांचे नातू होत. त्यांचे सोबत बाळेकुंद्री येथे आणि बेळगाव येथे पंत महाराजांच्या मठाच्या येथे जाण्याचा योग आला.
२०१५ साल असावे कदाचित. देऊळगाव राजा (बुलढाणा) येथे ऑफिस च्या एका ऑडिट साठी गेलो होतो. तेथील श्री देशपांडे यांनी आम्हाला परत जालन्याला रेल्वे स्टेशनला सोडताना सांगितले दत्त आश्रम बद्दल. मी आणि देवधर सर दोघेही होतो. तेथे आम्हाला ताई महाराज यांच्या दर्शनाचा योग आला. ताई महाराजांनी अगदी बाळाप्रमाणे विचारपूस करून प्रसाद घेतल्या शिवाय (जेवल्याशिवाय ) जायचं नाही असा आग्रहच केला.
त्यानंतर गाणगापूर, अक्कलकोट असे पुन्हा झाले. आणि वाडी तर जेव्हा सांगलीला जातो तेव्हा होतच असते.
त्यानंतर असे कित्येक योगायोग झाले की माझ्या आयुष्यात अनेक माणसे ही दत्तसंप्रदायातील आली. दत्त संप्रदायातील अनेक ग्रंथ, स्तोत्रे आणि महान संत यांचा परिचय होतच गेला आणि होतो आहे.
शेवटी प्रभू हे घडवून आणतात हेच सत्य.
आजच्या या लेखातील मागोव्यामध्ये मला हे लिहिण्याची बुद्धी देखील दत्त महाराजांनी दिली हेच खरे. सरते शेवटी वाचनात आलेली एक गोष्ट आठवते.
प. प. गुरुमाऊली वासुदेवानंद सरस्वती टेम्बे स्वामी महाराज नरसोबा वाडीला आले होते त्यावेळी श्रींच्या दर्शनासाठी मुख्य द्वारातून घाटावर आले कृष्णा माईचे दर्शन घेतले मनोमन प्रार्थना चालू होती आणि त्याच वेळी अतिशय सुमधुर आवाजात एक स्त्री त्यांनीच लिहलेली करुणात्रिपदी आर्त स्वरात म्हणत होती,स्वामी महाराज घाटावर तसेच उभे राहिले.
तेथेच त्यांना भाव समाधी लागली,डोळ्यातून अश्रू धारा वाहू लागल्या. हे दृश्य पाहून आजूबाजूला असलेली पुजारी मंडळी आवक होऊन पहात होती,कारण त्यांना माहीत होते ही करुणात्रिपदी म्हणणारी स्त्री सर्वसंग परित्याग करून आलेली वारांगना होती,आत्ताच्या भाषेत सांगायचे झाले तर करून करून चुकली आणि देव पूजेला लागली.
स्वामी महाराजांची भाव समाधी उतरली,लगेच त्या स्त्री बद्दल पुजारी मंडळी सांगायला लागले पण काय सांगू! स्वामी महाराजांनी आपली एक नजर पुजाऱ्यांकडे नेली मात्र ! आपल्या नजरेनेच काय सांगायचे ते पुजाऱ्याना सांगितले. थेट त्या दत्त भक्तीत रममाण झालेल्या स्त्री जवळ आले आपल्या प्रेमळ दृष्टीने आशीर्वाद दिले,आशीर्वाद नव्हे हो,तिला दिलेला तो नेत्रानुग्रह होता. केवढे तिचे पूर्व जन्मीचे भाग्य की जेथे प.प.श्री नरसिह सरस्वती स्वामी महाराजांनी 12 वर्षे तपश्यर्या केली ती पुण्यभूमी तेथेच स्वतः स्वामी महाराजांच्या रुपात नेत्रानुग्रह मिळतो,म्हणून सांगतो सद्गुरूंनाथ महाराजांना सगळे शिष्य सारखे असतात.आपली भक्ती कमी पडते ती साधनेच्या माध्यमातून वाढवायची असते. तर मला वाटते त्या वारांगनेचा जसा स्वामी महाराजांनी उद्धार केला त्या प्रमाणे आपले ही अनेक दोष पोटात घालून नक्की उद्धार करतील!
ते पद आहे गुरुस्तोत्रपंचक !!
।। गुरुस्तोत्रपंचक ।। भावे नमू श्री गुरूच्या पदांसी जे आपदासी हरी दे पदासी दासी परी श्री नमि ज्या पदासी यासी भजे तो नमितो पदांसी ।।१।। सतत विनतगम्य श्रेष्ठ दुष्टां अगम्य सदयहृदयलभ्य प्रार्थिती ज्यांसी सभ्य समद विमद होती यत्प्रसादें न होती कुगती सुगती देती त्या पदा हे विनंती ।। २।। गुरुपदा विपदापहरा सदा अभयदा भयदामयदारदा हृतवदान्यमदा तव दास्य दे अमदादा गदहा न कुदास्य दे ।।३।। नमस्ते भवारे नमस्ते शतारे नमस्तेSघवैरे प्रशस्तेष्टकत्रे नमस्ते खलारे विहस्तेष्टदात्रे नमस्तेSरीवैरे समस्तेष्टसत्रे ।।४।। गुरुपद मद वारी सर्व भेदां निवारी गुरुपद गद वारी सर्व खेदा निवारी सतत विनत होता वारी जे आपदांसी सतत विनत होऊ आम्ही हि त्या पदासी ।।५।। भावे पठती जे लोक हे गुरुस्तोत्रपंचक । तया होय ज्ञान बरे वासुदेव म्हणे त्वरें ।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त । ।। इति श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचितं श्री गुरुपंचक स्तोत्र संपुर्णम ।।
असाच तुमचा आमचा उद्धार दत्तप्रभू करोत ही त्यांच्या चरणी प्रार्थना !!
सरतेशेवटी माझ्या गुरुमाऊलींना वंदन करून झालेली सेवा त्यांच्याच चरणी अर्पण करतो.
धन्यवाद !! आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये किंवा मेल वर जरूर कळवा.
Comments